IND vs AUS 4th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि महत्वाचा सामना आज (दि. 01) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर होणार आहे. मालिका विजयासाठी हा सामना भारताच्या दृष्टीने महत्वाचा असून ऑस्ट्रेलिया देखील मालिका 2 – 2 अशी बरोबरीत आणण्यासाठी या सामन्यात आपलं सर्वस्व पणाला लावणार आहे.
अॅनिमल आणि सॅम बहादूरमध्ये टक्कर, विकी कौशल की रणबीर कपूर, कोण मोडणार रेकॉर्ड ?
दरम्यान, सामन्याला अवघे काही तास उरले असताना स्टेडियमच्या काही भागात वीज नसल्याचे उघडकीस आले. लक्षणीय बाब म्हणजे २००९ पासून वीजबिल थकवल्याने संबंधित स्टेडियमची वीज कापण्यात आली असल्याचे कळते. स्टेडियमचे ३.१६ कोटी रूपयांचे बिल थकित आहे, त्यामुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन पाच वर्षांपूर्वी कापण्यात आले होते. मात्र, छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून तात्पुरते वीज कनेक्शन देण्यात आले आहे, परंतु तात्पुरत्या वीजेमुळे केवळ प्रेक्षक गॅलरी आणि बॉक्स येथील भागात प्रकाश जातो. खरं तर आजच्या सामन्यादरम्यान मोठ्या लाइट्स जनरेटर वापरून चालवाव्या लागणार आहेत.
३.१६ कोटींची थकबाकी
सध्या असलेल्या तात्पुरत्या वीजेची क्षमता २०० किलोवॅट एवढी आहे, ती १ हजार किलोवॅटपर्यंत करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे, परंतु त्यावर अद्याप काम सुरू झालेले नाही. २०१८ मध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्टेडियममध्ये वीजपुरवठा नसल्याचे लक्षात आल्यावर एकच गोंधळ झाला होता. त्यानंतरच सर्व प्रकार उघडकीस आला आणि २००९ पासून वीज बिल भरले नसल्याचे सांगण्यात आले, जे ३.१६ कोटी एवढे थकित आहे.
मैदानावर एकच आंतरराष्ट्रीय सामना झाला
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. हा सामना या वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामना होता.
तर या मैदानावरील शेवटचा टी-20 सामना २०१८ मध्ये झाला होता. हा सामनासय्यद मुश्ताक अली ट्रॉफचा होता. त्या सामन्यात राजस्थान आणि रेल्वेचे संघ आमने सामने होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ –
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.